कर्जमाफी ला घेऊन प्रहाचा महाएल्गार वर्धा, चंद्रपूर वाहतूक पूर्णतः ठप्प लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क

   लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क 
नागपूर – सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करा, दिव्यांगांना न्याय द्या, या व अन्य अशा २० प्रमुख मागण्यांसाठी आक्रमक झालेले माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या महा एल्गार आंदोलनामुळे वर्धा, चंद्रपूर, हैदराबादसह अमरावती आणि जबलपूर महामार्गावरील वाहतूक मंगळवारी सायंकाळी सहा नंतर पूर्णतः ठप्प झाली. आक्रमक झालेले शेतकरी संपूर्ण वर्धा मार्गावर ठिय्या मांडून बसले आहेत. जामठा येथील कापूस संशोधन केंद्राच्या ३० एकर मैदानासह संपूर्ण वर्धा मार्गावर आंदोलक पसरल्याने नागपूरकडे येणारी सर्व वाहतूक जागच्या जागी खोळंबली आहे. संभाव्य परिस्थिती पाहता आंदोलक समृद्दी महामार्गावर पोहोचू नये यासाठी पोलीसांनी समृद्धीच्या आरंभबिंदूकडे जाणारा मार्गही पूर्णतः बंद केला आहे.
विदर्भासह मराठवाड्यातील २५ हजारांहून अधिक शेतकरी एल्गारच्या तयारीने मैदानात उतरल्याने सरकारला देखील धडकी भरल्यासारखी परिस्थिती आहे. वर्धेसह, चंद्रपूर, हैदराबाद आणि जबपूरवरून बाह्यवळण रस्ता मार्गे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटकडून अमरावतीच्या दिशेने जाणारी आणि तिकडू येणारी सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प पडली आहे. बुटीबोरी ते जामठा रस्ता संपूर्णपणे आंदोलनामुळे जाम झाला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी संपूर्ण वर्धा मार्गांवर ठाण मांडल्याने मिहान पुलाखाली देखील चक्का जाम झाला आहे.
महा एल्गारची धास्ती घेतलेल्या राज्यसरकारने सिव्हिल लाईन्स परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे संपूर्ण सिव्हिल लाईन्सला छावणीचे स्वरूप आले आहे. रोज सायंकाळ गजबजणारा वॉकर्स स्ट्रीट वाहतूकीस पूर्णपणे बंद करण्यात आला. रोज पायी फिरणाऱ्यांना देखील मंगळवारी या मार्गावर मनाई करण्यात आली. कामगिरीकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून वाहतूक थांबवली आहे. सोबतच आंदोलक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल आणि रेशिमबागकडेही जाऊ शकतात अशी गुप्त सूचना मिळताच पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी देखील कडेकोट बंदोबस्त वाढवला