मानव व नैसर्गिक संसाधनाच्या रक्षणातच देशाचा विकास - न्यायमूर्ती वाळके

       आदि भारत। गोंदिया महाराष्ट्र 
गोंदिया (प्रतिनिधी) - भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहेत. या अधिकारामुळे नागिरकांना व्यक्तिमत्व विकासाचे एक कवच मिळाले आहे. सोबतच नागरिकांकडून कर्तव्याची अपेक्षा सुद्धा बाळगली आहे. नागिरकांनी कर्त्यव्ये बजावत मानव व नैसर्गिक संसाधनाचे रक्षण केले तर देशात सुख समृद्धी नांदेल, देशाचा विकास घडून येईल, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, वरिष्ठ दिवाणी न्यायमूर्ती एन. के. वाळके यांनी केले.
गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग आणि विधी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिनानिमीत्त व्याख्यानाच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्यायमूर्ती एन. के. वाळके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे होते. मार्गदर्शक म्हणून गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा तथा दामिनी कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा सुरळकर, जिल्हा न्यायालयाचे अधिवक्ता रितेश आगाशे, अंतर्गत गुणवत्ता हमी कशाचे समनव्यक डॉ. अंबादास बाकरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एच पी पारधी, विधी विभागाचे डॉ. उमेश उदापुरे उपस्थित होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राचार्य मोहतुरे यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची शपथ उपस्थितांना दिली. भारतीय संविधानातील नागरिकांचे मूलभूत अधिकार या विषयावर बोलताना न्यायमूर्ती वाळके पुढे म्हणाले, सातत्याने सुधारणा करण्यास वाव असणारे भारतीय संविधान जिवंत आहे. आजपर्यंत १०० पेक्षा अधिक संविधान संशोधन करण्यात आले आहेत. संविधानासोबत या देशातील नागरिकांनी सुद्धा स्वतःत सुधारणा करण्याची आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली तर या देशाचे भविष्य उज्वल आहे. यावेळी महिला सक्षमीकरणात भारतीय संविधानाची भूमिका या विषयावर बोलताना पोलीस उपनिरीक्ष पूजा सुरळकर म्हणाल्या स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नवे. समाज माध्यमाच्या माध्यमातून महिला, तरुण मुली यांच्यावर मोहिनी टाकून शोषण करण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. युवतींनी समाज माध्यमाचा वापर जरून करावा मात्र लोभापासून दूर राहावे. संविधानातील अधिकाराचा वापर करून स्वतःचा विकास साधावा असे आवाहन सुरळकर यांनी केले. यावेळी अधिवक्ता आगाशे यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकाराची माहिती दिली. अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. मोहतुरे यांनी कायदे व कर्त्यव्य पालनाचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. घनशाम गेडेकर, प्रास्ताविक डॉ. उमेश उदापुरे तर आभार डॉ. किशोर वासनिक यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग आणि विधी विभागाचे प्राध्यापक, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे  सदस्य तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.