सरपंच, उपसरपंचाने ठोकले ग्रामपंचायतला कुलूप आदि भारत । गोंदिया (महाराष्ट्र)

    आदि भारत । गोंदिया (महाराष्ट्र) 
अर्जुनी मोर तालुक्यातील खामखुरा ग्रामपंचायतला दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामविकास अधिकारी आर. के. भांडारकर यांच्या मनमर्जी कारभाराला कंटाळून अखेर कुलूप ठोकले.
गावातील जुन्या विहिरीवर झाकण्यासाठी लोखंडी कठड्याची आर्डर भंडारा जिल्ह्यातील सिहोरा येथील लकीश्या इंटरप्राईजेसला देण्यात आली होती. सदर साहित्य गावात आल्यानंतर सरपंच व उपसरपंचांनी ते साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने लावण्यास मनाई केली. मात्र ग्राम विकास अधिकारी यांनी सरपंच उपसरपंचाचे म्हणणे धुडकावून लावून विहिरीवर कठडे लावण्यात सांगितल्याचे 24 नोव्हेंबरच्या सायकांळी पाच वाजेच्या सुमारास ही बाब सरपंच उपसरपंचाच्या लक्षात आल्याने त्यांनी हरकत घेऊन काम करण्यास मनाई केली. ग्राम विकास अधिकारी हे कार्यालयात वेळेवर येत नाही. त्यामुळे जनतेच्या दाखल्यांवर सह्या होत नाही. एक दाखला मिळविण्यासाठी पाच ते सहा दिवसाचा कालावधी लागतो. तसेच
या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक देणेकरांचे देणे वेळेवर होत नाही. तसेच मासिक सभा व ग्रामसभा यांचे झालेले ठराव संबंधित विभागाला वेळेवर जायला पाहिजेत, मात्र ग्रामविकास अधिकाऱ्याच्या अलगर्जीपणामुळे तीन ते चार महिन्याच्या कालावधीनंतर संबंधित विभागाला जातात. त्यामुळे गाव विकासात अडथळे निर्माण होतात व अखेर गावकरी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत कमिटीला कारणीभूत
ठरवितात. त्यामुळे अशा कामचुकार ग्रामविकास अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात यावी. ग्रामविकास अधिकाऱ्याचे हे नेहमीचे मनमर्जीचे वागणे असल्याने अखेर सरपंच रेखा सयाम व उपसरपंच निप्पल बरैया यांनी असे मुजोर ग्रामविकास अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
ग्रामविकास अधिकारी आर. के. भंडारकर हे स्वतःच्या मन मर्जीने कामे करतात पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत नाही. तसेच वरिष्ठ अधिकारी सुद्धा ग्रामविकास अधिकाऱ्याची बाजू घेऊन बोलतात. त्यामुळे गाव विकास करणे शक्य होत नाही. गटविकास अधिकारी येतील तेव्हाच ग्रामपंचायत कार्यालय सुरू होईल असे उपसरपंच निप्पल बरैया यांनी सांगितले.
या संदर्भाने ग्रामविकास अधिकारी आर. के. भांडारकर यांना विचारणा केली असता, रेकॉर्ड पाहूनच सांगू शकतो. रेकॉर्ड कुलूप बंद झाल्यामुळे मी काही सांगू शकत नाही, असे सांगितले.