आदि भारत। गोंदिया महाराष्ट्र
अर्जुनी-मोर.-नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नवेगाव राष्ट्रीय उद्यानात वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला.वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात बछड्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान अंतर्गत काली माती संरक्षण कुटी येथील वनरक्षक आणि संरक्षण मजूर यांनी पहाटेला वाघांचा जोरा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकला. दिवस उजाडल्यावर गस्तीवर असताना त्यांना गवतामध्ये वाघाचा बछडा जखमी असल्याचे दिसले. याबाबतची माहिती त्यांनी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. क्षेत्र संचालक पियुष जगताप, उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे, विभागीय वनाधिकारी अतुल देवकर, उपविभागीय वनाधिकारी बाळकृष्ण दुर्गे, आणि वनपरिक्षेत्राधिकारी प्रतिभा रामटेके, हे जलद बचाव दलाच्या चमु सह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता वाघाचा बछडा हा मृत झाल्याचे दिसले. सदर वाघाचा बछडा अंदाजे दीड ते दोन वर्ष वयाचा नर असून या क्षेत्रात नवीन असल्याचे समजते. बछड्याच्या मानेवर आणि डोक्यावर जखमा असल्याचे दिसून आले. शवविच्छेदन करण्यासाठी जवळील पर्यटन गेट जवळ मृतदेह हलविण्यात आला. यावेळी एनटीसीएचे प्रतिनिधी म्हणून भीमराव लाडे, मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी मुकुंद धुर्वे, स्थानिक तीन पशुवैद्यकीय अधिकारी आणि व्याघ्र प्रकल्पाचे कंत्राटी पशु वैद्यकीय अधिकारी मेघराज तुलावी उपस्थित होते. वाघाच्या बछड्याचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.