निवडणूक अधिकारी कांबळे यांची कार्यमुक्ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा बदल

     आदि भारत ।गोंदिया महाराष्ट्र
राज्यातील 247 नगरपरिषद व 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 संदर्भातील कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगरपरिषद तसेच गोरेगाव व सालेकसा नगरपंचायत येथे दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
         मतमोजणीची प्रक्रिया पूर्णपणे नि:पक्षपाती, पारदर्शक आणि निर्विघ्नरीतीने पार पडावी यासाठी तसेच प्रशासकीय कारणास्तव सालेकसा नगरपंचायत येथील निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांची कार्यमुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांची नवीन निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रमोद कांबळे यांचा बदल करून अमृता सुतार यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
        प्रशासनाच्या मते, मतमोजणी ही निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पायरी असून तिची विश्वसनीयता कायम ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रक्रियेत कोणतीही शंका किंवा गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून हा अधिकारी वर्गातील बदल करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मतमोजणीची प्रक्रिया अधिक काटेकोर, व्यवस्थित आणि लोकशाही मूल्यांना अनुसरून पार पडेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.