प्रेस क्लब गोंदियातर्फे आज पत्रकारदिन नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा होणार सत्कार

     आदि भारत। गोंदिया महाराष्ट्र 
गोंदिया ः मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रेस क्लब गोंदियाच्या वतीने मंगळवारी (ता. ६) दुपारी १२ वाजता येथील राईस मिलर्स असोसिएशनच्या सभागृहात पत्रकारदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे-निमसरकर राहतील. दीपप्रज्वलन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून अदानी पॉवर प्रकल्प प्रमुख मयंक दोषी, तिरोडा येथील अदानी फाउंडेशन प्रमुख बिमुल पटेल, राईस मील असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, राईस मील असोसिएशनचे सचिव महेश अग्रवाल उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात गोंदियाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन शेंडे, तिरोड्याचे नगराध्यक्ष अशोक असाटी, गोरेगावचे नगराध्यक्ष तेजराम बिसेन, सालेकसाचे नगराध्यक्ष विजय फुंडे यांच्यासह नगरसेवक पंकज यादव, नगरसेवक अभय अग्रवाल, नगरसेवक देवेंद्र तिवारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रेस क्लब गोंदियाचे मार्गदर्शक खेमेंद्र कटरे, अध्यक्ष हिदायत शेख, कार्याध्यक्ष सावन डोये, उपाध्यक्ष संतोष शर्मा, सचिव प्रमोद नागनाथे व सदस्यांनी केले आहे.